पुण्यात शाळेची घंटा वाजणार, पुढील महिन्यात शाळा सुरु होणार
आता पुणे शहरात (Pune) शाळा (school) सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.
पुणे : राज्यात शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली होती. त्यानुसार राज्यात 5 वी ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून होणार आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्या त्या विभागात निर्णय घेण्यात यावा, असे स्पष्ट निर्देशही दिले. त्यानुसार आता पुणे शहरात (Pune) शाळा (school) सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे. त्यानुसार आता शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. (The Pune Municipal Corporation has decided to reopen schools for classes 5 to 8 from February 1)
पुणे शहरातील 5 वी ते 8 वीच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरु होणार आहेत. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून या शाळा सुरू करण्याबाबतचा आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. जरी शाळा सुरु होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी सहमती आवश्यक असून ही सहमती शिक्षण पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभाग यांना सादर करावी लागणार आहे.
शाळा सुरू करण्याआधी शाळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे.
तसेच शाळा प्रशासनाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हन आदी वाहनांचे निर्जंतुकीकरण नियमित होण्यासाठी शाळा प्रशासनाने पाहणी करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी बंधनकारक असून चाचणी प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्या तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार असावी. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावावेत. शाळेच्या अंतर्गत आणि बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहताना मुलांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
हे नियम बंधनकारक
- शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे
- स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर ) निर्जंतुकीकरण करावे
- वर्ग कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये भरवण्यात येऊ नये.
- हवा खेळती राहण्यासाठी वर्ग खोल्यांची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात