ठाणे : वाढत्या वायुप्रदूषणामुळे ऑक्सिजनची पातळी दिवसेंदिवस घसरत असताना ठाणे रेल्वे स्थानकात देशातील दुसरे ऑक्सिजन पार्लर सुरू केलं जातं आहे. १८ वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे ठाणेकरांना शुद्ध हवेचा पुरवठा करणार आहेत. रेल्वेस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी ऑक्सिजन पार्लर ही संकल्पना नावरूपाला येते आहे. ए-वन अॅग्रो वर्ल्डचे अमित अमरीतकर यांनी ठाण्याला भेट देऊन पार्लरसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली. ठाण्यापाठोपाठ कल्याण आणि दादर या स्थानकांवर ही ऑक्सिजन पार्लर उभारली जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्लर उभारण्यासाठी लागणाऱ्या 25 बाय 10 फूट जागेपेक्षा जास्त जागा ठाणे रेल्वे प्रशासनाने देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. नासाच्या वतीने अंतराळात सोडण्यात येणाऱ्या यानातून तेथे गेल्यावर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर अंतराळवीरांना, ज्या झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, अशी झाडे या पार्लरमध्ये लावणार आहेत. ही झाडे घरातही ठेवणे शक्य आहे. यामध्ये स्नेक प्लान्ट, चायनीज बांबू, झामिया आणि ङोड प्लान्ट यासारख्या 18 प्रकारची झाडे असणार आहेत. यापैकी एक झाड 10 बाय 100 फुटांमधील हवा शुद्ध करते. तसेच 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते. 


शिवाय या झाडांना आठ दिवसांतून एकदा पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर ही झाडे विषारी वायू शोषून तेथे ऑक्सिजनची निर्मिती करते. त्यामुळे हे पार्लर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. तर या रेल्वे संकल्पनेचे सगळ्यांकडून स्वागत होत आहे. ठाणे स्टेशनवरून रोज सात लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे अशा ऑक्सिजन पार्लरची गरज असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे.