कोरेगाव भिमा : शौर्य दिनासाठी कडक बंदोबस्त; वाहतूक व्यवस्थेतही बदल
अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून....
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे :१ जानेवारीला कोरेगाव भिमामध्ये विजयस्तंभावर २०२वा शौर्य दिन साजरा होणार आहे. याच धर्तीवर येथील परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला देशभरातून असंख्य नागरिक येणार असताना यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन गर्दीत काही गोंधळ होऊ नये आणि अफवा पसरू नयेत यासाठी एक जानेवारीला या परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवणे हा प्रशासनाचा उद्देश नसून अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
गर्दी होणाऱ्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे एक जानेवारीला पोलीस आणि अन्य अत्यावश्यक विभागांसाठी हॉट लाइन ची व्यवस्था करण्यात आली आहेय. त्याशिवाय येणाऱ्या भाविकांना "इमर्जन्सी कम्युनिकेशन व्हॅन"ची सुविधा पुरवण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी या भागातील शाळा, आठवडी बाजार आणि अन्य कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत. वाघोली, लोणीकंद, पेरणे फाटा, कोरेगाव-भीमा, शिक्रापूर, सणसवाडी या भागातील मद्यविक्रीची दुकानंही बंद ठेवली जाणार आहे.
पुणे- नगर महामार्गावरील वाहतुक एक जानेवारीला बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नाशिकहुन येणाऱ्या वाहनांना परतीच्या मार्गासाठी तुळापूर - मरकळ- आळंदीमार्गे जावं लागणार आहे. तर, सोलापूर- पुणे- सातारामार्गे येणारी वाहने ही येताना वाघोलीमार्गे येतील पण जाताना लोणीकंद- केसनंद- देहूफाटा मार्गे सोलापूर मार्गाकडे जाऊ शकतील. मागील वर्षी या ठिकाणी दुपारनंतरच्या वेळामध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच आधारे, यंदाच्या वर्षी पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये यासाठी दोन स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं, आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलं आहे. विजयस्तंभ शहरात शौर्य दिनानिमित्त ७४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, टिक टॉकचे २५ व्हिडीओ आणि फेसबुकवरील १५ पेज बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.