जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : हवामान खात्याच्या चुकत असलेल्या अंदाजांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी उदघाटन केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रातील साहित्याची चोरी झाल्याचं उघड झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० एप्रिलला डोंगरगावमध्ये राज्यातल्या पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र पाचच महिन्यात त्याचा बोजवारा उडाला. केंद्र परिसरात गवत आणि झुडुपं उगवली आहेत. सोलर पॅनल आणि लाईटही चोरीला गेलेत. तांत्रिक साहित्याचीही तोडफोड झालीय.


कृषी हवामान क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणारा महावेध हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. सर्वच महसूल मंडळांमध्ये राज्य सरकारने हवामान केंद्राच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक स्वयंचलित केंद्रातून तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वा-याचा वेग आणि दिशा यांची अचूक माहिती दर १० मिनिटांनी उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे. स्कायमेटकडेच देखभाल करण्याची जबाबदारी आहे. या चोरीची तक्रार करण्यात आलीय.


एकीकडे हवामानाचा अचूक अंदाज येत नसल्याने शेतक-यांचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे सरकारने निर्माण केलेली अत्याधुनिक यंत्रणा टिकवता येत नसेल तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे. त्यामुळे डोंगरगाववरून योग्य तो धडा घेण्याची गरज आहे.