`सेल्फी`च्या नादात नदीत कोसळल्या तीन मुली... एकीचा मृत्यू
सेल्फीचं वेड काही कमी होताना दिसत नाही...
पुणे : मुसळधार पाऊस आणि त्यात सेल्फीचा अनावश्यक नाद तुमच्या जीवावर उठू शकतो... अशीच एक घटना पुण्यात घडलीय. पुण्याच्या इंद्रायणी नदीच्या किनारी पाण्यासोबत सेल्फी घेणं तीन मुलींना चांगलंच महागात पडलंय.
सेल्फी घेतानाच तिघींचा तोल जाऊन या तिघी जणी नदीत कोसळल्या... यापैंकी पकडण्यासाठी दोघींना पाण्यातील दगडांची मदत झाली... त्यांना बुडताना आणि वाहत जाताना पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तिघींपैंकी दोघींना तर वाचवलं परंतु, एकीला वाचवण्यात त्यांना अपयश आलं.
मृत १७ वर्षीय मुलीचं नाव शालिनी चंद्रबालन असल्याचं समजतंय. ती ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्सची विद्यार्थिनी होती. शालिनीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांना जोरदार धक्का बसलाय.
खरंतर सेल्फीमुळे याआधीही अनेक अपघात घडलेत आणि या अपघातांत अनेकांनी आपले प्राणही गमावलेत. पण सेल्फीचं वेड काही कमी होताना दिसत नाही...