COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईदिप ढोबळे, झी मीडिया, घोडेगाव, पुणे : तुमच्या स्वत:च्या नावावर घर आणि जमीन असूनही त्या जमिनीत आणि घरात तुम्हाला येऊच दिलं जात नसेल तर... ही अडवणूक त्या जमिनीशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीनं केली तर... नेमकं असंच पुणे जिल्ह्यातील घोडेगावमधल्या एका वृद्धेबाबत घडलं आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुका तहसील कार्यालयासमोर ७० वर्षांच्या सरस्वतीबाई काळे उपोषणाला बसल्या आहेत. स्वतःची जमीन असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना या वयात आपल्या भावाकडे राहून मोलमजुरी करावी लागत आहे. कारण त्यांच्या जमिनीशी काहिही संबंध नसलेली व्यक्ती त्यांना त्यांच्या जमिनीत येऊही देत नाही. त्यामुळे, न्यायासाठी सरस्वतीबाई काळे यांच्यासमोर बेमुदत उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. 


हक्कासाठी गेली दहा वर्षं सरस्वतीबाईंचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरु आहे. मात्र यंत्रणेनं त्याची साधी दखलही घेतलेली नाही. या सर्व प्रकारणाबाबत आम्ही आंबेगावच्या नायब तहसीलदारांना विचारलं असता, त्यांनी मात्र काढता पाय घेतला. म्हणजेच, दहा वर्षांपासूनचा सरस्वतीबाईंचा पाठपुरावा, सरकार दरबारी शून्य ठरला आहे. 


आयुष्याच्या या उतरत्या वयात सरस्वतीबाईंना हा संघर्ष करावा लागत आहे. आता तरी सरकार-प्रशासन जागं होऊन जिवंतपणी त्यांना न्याय मिळवून देणार का? हा खरा प्रश्न आहे.