लेखक, समीक्षक शंकर सारडा यांचे निधन, अमित देशमुख यांची श्रद्धांजली
प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (Shankar sarda ) यांचे गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (Shankar sarda ) यांचे गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. (Shankar sarda passes away)मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. पार्किन्सन या आजाराने ते गेल्या काही वर्षांपासून त्रस्त होते. दरम्यान, ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शंकर सारडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
4 सप्टेंबर 1937 रोजी महाबळेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. सारडा हे पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होते. किशोरवयापासूनच त्यांचं लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध झाले आहे. पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार अशी त्यांची ओळख होती. अनेक नामांकित आणि दर्जेदार वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांना मोठा अनुभव होता.
६०हून अधिक पुस्तके आणि दोन हजांराहून जास्त पुस्तकांचे समीक्षण करणाऱ्या सारडा यांनी प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद केला. शंकर सारडा यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार लेखक, साहित्यिक आणि समीक्षक गमावला आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.
सारडा यांचे साहित्य
झिपऱ्या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.