Nanda Khare Death : ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचं निधन
Nanda Khare Death : नंदा खरे यांची ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’, ‘उद्या’, ‘कहाणी मानवप्राण्यांची’, ‘ऐवजी’ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली होत्या.
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक अनंत ऊर्फ नंदा खरे यांचं दीर्घ आजाराने (Nanda Khare Death) शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विद्यागौरी, मुलगा अमिताभ, मुलगी नर्मदा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नंदा खरे यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (senior literary anant aka nanda khare passed away at age of 76 in pune)
नंदा खरे यांची ग्रंथसंपदा आणि पुरस्कार
आपल्या लेखनात समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान देणारे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’, ‘उद्या’, ‘कहाणी मानवप्राण्यांची’, ‘ऐवजी’ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली होत्या.
त्यांच्या ‘वीसशे पन्नास’ या विज्ञान कादंबरीस विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार, ‘कहाणी मानवप्राण्याची’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार, कादंबरीलेखनासाठी ‘शब्द : द बुक गॅलरी’ संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला होता.
‘उद्या’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला होता. मात्र, समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे म्हणत २०१७ नंतर कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.
खरे यांनी ‘आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. काही काळ ते मराठी विज्ञान परिषदेशीही संलग्न होते. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी घेतली होती. एका खाजगी कंत्राटदार कंपनीत त्यांनी ३४ वर्षे भागीदार व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. उजनी धरणाचे बांधकाम खरे यांनी केले आहे.