मुंबई: गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला प्रत्यक्षात मोठा तडाखा बसला नसला तरी त्यामुळे अति मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पुन्हा एकदा पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसानं हाहाकार माजवला आहे. गेले तीन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसानं पिकं भुईसपाट झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आधीच परतीचा पाऊस लांबणीवर पडला. आता निसर्ग, तौत्के पाठोपाठ येणाऱ्या या चक्रीवादळांमुळे होणारा पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुलाब चक्रीवादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस झाला. 9 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टही देण्यात आला होता. आता गुलाब नंतर शाहीन चक्रीवादळ घोंघावत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 


गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.   


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलाब चक्रीवादळ उत्तर तेलंगणाच्या दिशेने सरकत आहे. ज्यामुळे अरबी समुद्रावर आणखी एक चक्रीवादळ 'शाहीन' तयार होऊ शकते. ईशान्य अरबी समुद्र त्याला लागून असलेल्या गुजरात किनाऱ्यावर 30 सप्टेंबर संध्याकाळी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शाहीन चक्रीवादळाचा धोका असल्याचा अलर्ट IMD कडून देण्यात आला आहे. 


शाहीन चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून गुजरातसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सौरराष्ट्र या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशातील आणखी काही राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असंही यावेळी हवामान विभागाने सांगितलं आहे.