वाटेगाव: लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या ९८व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जन्मगावी वाटेगाव (ता. वाळवा) येथे महाराष्ट्रातील विविध शाहिरांनी एकत्र येऊन शाहिरीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊंना मानवंदना दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कलासंगिनीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या वैचारिक जागर कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत, शाहीर शीतल साठे, शाहीर सचिन माळी, शाहीर सदाशिव निकम यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या ५१ हून अधिक कलावंतांनी अण्णाभाऊंची शाहिरी गीते सादर करून वैचारिक प्रबोधनाचा जागर घडविला.


‘लोकशाहिराला शाहिरांची सलामी’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कलासंगिनी महाराष्ट्र, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, प्रगतिशील लेखक संघ, इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन, मानवहित सामाजिक अभियान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाहिराला शाहिरांची सलामी’ या कार्यक्रमाचे आयोजन वाटेगाव येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कासेगाव ते वाटेगाव या मार्गावर अण्णाभाऊंनी लिहिलेल्या कथा-कादंबरी पुस्तकांची साहित्य पालखी काढण्यात आली. साहित्यिक प्रा. तानाजी ठोंबरे, शाहिर संभाजी भगत आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील आदी मान्यवरांनी साहित्य पालखी स्वत:च्या खांद्यावर वाहून नेत अण्णाभाऊंचा साहित्यविचार समाजापर्यंत नेण्याचा निर्धार दर्शविला. यानंतर वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहात शाहिरी महाजलशाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.


प्रारंभी साहित्यिक प्रा. तानाजी ठोंबरे, शाहिर संभाजी भगत, अण्णाभाऊंच्या सूनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. नामदेवराव गावडे, सांगली जिल्हासचिव कॉ. रमेश सहस्त्रबुद्धे, कोल्हापूर जिल्हासचिव कॉ. सतीशचंद्र कांबळे, ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनचे राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, शाहिर सचिन माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


शाहिरांच्या शाहिरीने उपस्थित मंत्रमुग्ध


उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, की अण्णाभाऊंनी नेहमीच भांडवलशाही, जातीयवाद व धर्मांधतेविरोधात आपला आवाज बुलंद केला. आपल्या साहित्यकृतीतून समाजातील विषमतेवर प्रखर हल्ला चढविला. त्यांच्या विचारांची गरज आजच्या काळातही तितकीच असून, तरूणांनी आता अण्णाभाऊंचे लढाऊ वारसदार बनावे. त्यानंतर शाहिर शीतल साठे यांनी ‘वंदितो लोकशाहिरा अण्णाभाऊ’ या गीतातून अण्णाभाऊंना वंदन करत शाहिरी कार्यक्रमाला प्रारंभ केला. शाहिर संभाजी भगत, कोल्हापूरचे शाहिर कॉम्रेड सदाशिव निकम, शाहिर सचिन माळी, महाराष्ट्र शाहिर परिषदेचे शाहिर श्रीरंग रणदिवे, विद्रोही शाहिरी जलशाचे शाहिर बाबासाहेब आटखिळे, एल्गार सांस्कृतिक मंचाचे शाहिर धम्मरक्षित रणदिवे, सांगलीचे शाहीर आलम बागणीकर, शाहीर डॉ. राजीव चव्हाण, शाहीर आझाद नायकवडी यांनी विविध वैचारिक शाहिरी गीते सादर करून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. राजवर्धन वायदंडे आणि राजवैष्णवी वायदंडे या बालशाहिरांनी तर आपल्या बुलंद व पहाडी आवाजात शाहिरी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले.


‘मराठा आंदोलन : जातियुद्ध की जातीअंत?’ या पुस्तिकेचे प्रकाशन 


दरम्यान, यावेळी शाहिर सचिन माळी लिखित ‘मराठा आंदोलन : जातियुद्ध की जातीअंत?’ या पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीमती सावित्रीबाई साठे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वाटेगावचे सरपंच सुरेश साठे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्यावतीने सर्व शाहिरी कलावंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


पंकज चव्हाण यांनी प्रास्तविक केले. सुशील लाड यांनी सूत्रसंचालन केले. सचिन साठे यांनी आभार मानले. याप्रसंगी पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारूती शिरतोडे, जि. प. माजी सभापती रवींद्र बर्डे, पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सचिन बर्डे, ग्रा. प. सदस्य विनोद जाधव यांच्यासह कोल्हापूर,सातारा व सांगली जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वीर फकिरा यांच्या स्मृतीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प


ब्रिटीश सत्तेला आव्हान देणाऱ्या वीर फकिरा यांच्या वाटेगाव येथील स्मृतीस्थळाचा येत्या वर्षभरात जीर्णोद्धार करण्याचा निर्धार यावेळी संयोजकांकडून व्यक्त करण्यात आला.