सातारा : टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळावे यासाठी तब्बल 18 किलोमीटर पायी चालत गावकऱ्यांनी कराडमध्ये मोर्चा काढला. आमचं ठरलंय पाणी आणायचं. म्हणत टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतीला मिळावे यासाठी कराड तालुक्यातील  शामगावमधील गावकऱ्यांनी गाव बंद ठेवत शामगाव ते कराड तहसीलदार कार्यालय असा 18 किलोमीटरचा रस्ता पायी गाठला. कराड तहसील कार्यालयासमोर यावेळी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात जास्त धरण सातारा जिल्ह्यात असताना सुद्धा हक्काचे पाणी मिळत नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शामगावसह 16 गावांची पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची दुरावस्था झालेली आहे. सांगली सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शामगाव गावातून कॅनॉलद्वारे जाते, मात्र गावाला पाणी मिळत नाही.


टेंभू योजना साकारताना शामगाव लाभ क्षेत्रात येणाऱ्या जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे हक्काचे पाणी असूनही पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ गावकऱ्यांवर आलेले आहे. वारंवार शासनदरबारी मागणी करूनही याची दखल न घेतल्याने शामगावकर ग्रामस्थांनी गट-तट विसरून पाण्यासाठी एकत्र येत बंदची हाक देत शामगाव येथून मोर्चा काढला. या मोर्चामध्ये लहान मुलांसह महिला आबालवृद्ध ग्रामस्थ सहभागी झाले होते. टेंभू योजनेचे आमच्या गावातून पाणी नेले. पण आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.