शरद मोहोळ हत्येमागे `मुळशी पॅटर्न`, नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणात (Sharad Mohal Murder Case) अखेर पोलिसांनी मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. एकूण 6 जणांना पोलिसांनी नवी मुंबई येथून ताब्यात घेतलं. त्यामध्ये रामदास मारणे (Ramdas Marane), विठ्ठल शेलार (Vitthal Shelar) या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे. पुण्यातून चौघांना ताब्यात घेण्यात आलं. मोहोळ खून प्रकरणात मारणेसह आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता.
मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणाचा तपास सुरू असताना मुख्य आरोपी रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला नवी मुंबईतून अटक केली
विठ्ठल शेलारने रचला कट
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी इथला आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरु झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून सन 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. भोर, वेल्हा, मुळशी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपदही विठ्ठल शेलारला देण्यात आलं होतं.
दोन दिवसांपासून पोलीस मागावर
मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली.
मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसंच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली होती. खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता. मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला करून सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा असे सांगितले होतं.