मुंबई / पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्यांविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर काही जणांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर सातत्याने शरद पवार यांची बदनामी करणारा व्हिडिओ आणि पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदाराने पोस्टचे स्क्रीन शॉट आणि यू ट्यूबचे व्हिडिओ पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केले आहेत.



 मागील काही महिने सोशल मीडियावरुन तणाव आणि भावना भडविण्याचे काम होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.  सांस्कृतिक महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय एकतेला तडा जातील, अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट होत असल्याने चिंता व्यक्त होत होती.  राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असे वाटत होते. मात्र, तसे काही होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि सायबर क्राईमने याची दखल घेण्याची मागणी होती आहे. 


शरद पवार यांच्याबाबत चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकून संभ्रम निर्माण करुन तो पसरविण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  दरम्यान, काही स्क्रिन शॉट पोलिसांना देण्यात आले आहेत. यात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.