उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - पवार
`यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.`
सातारा : मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना लहान पोरंटोरं समजू लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली. संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शीमध्ये सभेला पवार यांनी संबोधित केले. राज्याच्या राजकारणात बदल करण्यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणालेत.
हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन दिले. आता हे आश्वासन खोटे असल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्लेही पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता, असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित करत जोरदार हल्लाबोल चढवला.
देशाचे गृहमंत्री म्हणतात, शरद पवार यांनी ५० वर्षांत काय केले? त्यांना एकच प्रश्न करतो की तुमच्यातील 'एक माय का लाल' दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल, असा समाचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घेतला. तसेच आता ऐकायला येत आहे की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय, हाच प्रश्न पडला आहे. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकरी अडचणीत आहे, त्यावर हे लोक बोलत नाहीत, असे पवार म्हणालेत.
मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात, असा सवालही उपस्थित केला आहे.