मुंबई: गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी बुधवारी घडवून आणलेल्या भुसुरूंगाच्या स्फोटात सी-६० पथकाचे १६ जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे की, गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पवारांनी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी  साडे अकराच्या सुमारास सी- ६० पथकाचे जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर जवानांचे खासगी वाहन आले असता नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १६ जवान शहीद झाले. दरम्यान, घटनास्थळी नक्षलवादी आणि पोलिसांदरम्यान चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे. परिसरात तब्बल २०० नक्षलवादी लपून बसल्याचे सांगितले जाते. 




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केले. आम्ही सातत्याने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्याल चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.