कॉलेजच्या बाहेर पडेपर्यंत आम्हाला कधीच.... सायरस पुनावालांसोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी दिला उजाळा
Sharad Pawar : डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हाऊसिंग कॉम्प्लेक्सचा उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे उपस्थित होते. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे (serum institute) सीईओ आदर पूनावाला (adar poonawalla) यांना प्रथम डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
अभ्यास सोडून बाकीच्या क्षेत्रात जास्त लक्ष - शरद पवार
"सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ सायरस पूनावाला हे जेव्हा 9 ते 10 वर्षाचे होते तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहे.अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला आम्ही दोघेही एका वर्गात शिकलो.आमच्या दोघाचं एक वैशिष्ट्य होतं की आम्ही अभ्यासात लक्ष दिलं नाही. आम्ही अभ्यास सोडून बाकीच्या सर्व क्षेत्रात अधिक जास्तीचं लक्ष दिलं. त्यामुळे मी एक गोष्ट कटाक्षाने सांगतो. आम्ही दोघांनी एका गोष्टीत सातत्य ठेवलं की कॉलेजमधून बाहेर पडेपर्यंत आम्ही दोघांनी 36 ते 40 च्या पुढे कधी मार्क मिळवले नाहीत. ते 36 ते 40 मार्क मिळवण्याचे जतन आम्ही कायम ठेवलं," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आणि सायरस पुनावाला यांच्या मैत्रीला उजाळा दिला आहे.
पतंगराव कदम यांचे काम पाहून सर्वांना अभिमान - शरद पवार
"पतंगराव कदम हे अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. सांगली जिल्ह्यातील एका गावातून ते आले. रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत ते शिकले. त्यांनतर पुण्यात आले आणि भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली. पतंगराव कदम यांनी उभे केलेले काम पाहताना तुम्हा-आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. पतंगराव यांचा अनेक वर्षाचा कालखंड रयत शिक्षण संस्थेत गेला. 50 वर्षांपासून मी त्या संस्थेची जबाबदारी घेतली आहे. या काळात ते आमचे खंदे समर्थक होते. त्यांनी त्यांची रयतशी असलेली बांधिलकी सोडली नाही," असेही शरद पवार म्हणाले.
"आज डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार ज्यांना देण्यात आलं ते आदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटने एक मोठं नाव लौकीक केलं आहे. जगात जवळपास 160 देशात पुण्यात सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. आदर पुनावाला यांनी हे सर्व करत असताना सामाजिक भान राखण्याची देखील काळजी घेतली आहे. शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी जवळपास 100 हून अधिक वाहने त्यांनी पुणे महानगरपालिकेला दिली आहेत," असेही शरद पवार म्हणाले.