Jitendra Awhad Shared Ajit Pawar Photo: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या भाषणाच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणामध्ये बोलता बोलता अजित पवार सहज विरोधकांना टोला लगावताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये अनेकदा शाब्दिक खटके उडले आहेत. अजित पवार हे कटाक्षाने शरद पवारांचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करणं टाळतात. मात्र शरद पवार गटातील नेत्यांचा सूचक संदर्भ देत उल्लेख करत टीका करताना दिसतात. 'ठाण्याचा पठ्ठ्या' म्हणत अजित पवारांनी अनेकदा शरद पवार गटातील आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना अगदी ठाण्यात पोस्टरबाजी करुन उत्तर दिलं आहे. मात्र याच तू-तू मैं-मैंमध्ये आता नव्या अध्यायाची भर पडली आहे.


आव्हाड यांच्यावर साधलेला निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच कर्जत येथे पार पडलेल्या वैचारीक मंथन मेळाव्यात अजित पवारांनी सूचक पद्धतीने वरिष्ठ असा उल्लेख करत शरद पवारांच्या धोरणांबद्दलचे आपले आक्षेप भाषणामधून मांडले. याच भाषणामध्ये त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यासाठी काही लोकांना घेऊन आंदोलन करण्याचे निर्देश देण्यात आले होते असा दावा अजित पवारांनी केला. याचवेळी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाला उल्लेख करत मिश्कील टिका केली होती. आता याच टीकेला आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.


जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला फोटो; कॅप्शनमधून लगावला टोला


जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचं पोट दिसत असलेला फोटो पोस्ट करत त्यांनी खिल्ली उडवली आहे. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आव्हाड यांनी अजित पवारांचा एक फोटो पोस्ट केला आहे. एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले अजित पवार हात उंचावून उभे असल्याचं दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना आव्हाड यांनी, "दादा त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 पॅक अ‍ॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो," अशा कॅप्शनसहीत अजित पवारांचा हा स्टेजवरील फोटो शेअर केला आहे. आव्हाड यांनी 'हाहा' असं म्हणत फोटो पाहून हसू येत असल्याचंही सूचित केलं.




अजित पवार देणार उत्तर?


आता अजित पवार आव्हाडांनी डिवचल्यानंतर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी आव्हाडांनी केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.