Sharad Pawar News : शरद पवार यांनी लेक सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत सभांचा धडाका लावला होता. लेकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशीही शरद पवारांनी स्वत:ला झोकून दिलं. रणरणतं ऊन अन् शरीरात थकवा देखील दिसून येत होता. तर शरद पवारांचा आजच्या सभेत आवाजही बसल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द देखील केले आहेत. उद्या शरद पवारांचा मुक्काम गोविंदबागेत असणार आहे.  प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान बारामतीच्या सांगता सभेतही त्यांना बोलताना त्रास जाणवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांच्या सभेचा धडाका


तब्येत अस्वस्थामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या वतीने अकलूज येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज सकाळी शरद पवार यांनी सर्वप्रथम भोर येथील आर.आर. हायस्कूलच्या मैदानावर सभा घेतली. शरद पवार यांनी भोर नंतर इंदापूर येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर सभा घेतली.


दरम्यान, शरद पवारांच मतदान यंदा बारामतीत करणार आहेत. लेक सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी मतदान बारामती करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. माळेगावात शरद पवार मतदान करणार आहेत. तर मतदानाच्या दिवशी शरद पवार गोविंदबागेत थांबणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


दरम्यान, बारामतीसाठी 7 मे रोजी मतदान होणार असून आज रविवारी या लोकसभेतील प्रचाराची तोफ थंडावली. या निमित्ताने पवार काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे बारामतीत छुपा प्रचार होतोय का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.