मुंबई : विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजपला कळून चुकले आहे, हे राज्य आपल्या हातातून जाणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री इथे येऊन सभा घेतात. आपले मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, इतर केंद्रीय मंत्री आलेत ते इथे पर्यटनासाठी फिरतायत का? यांना खात्री झाली आहे. हे राज्य आपल्या हातातून जाईल की काय, लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे, असे प्रवार म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेच्या रणसंग्रामात राज्यात शरद पवार यांचा झंझावात सुरु असताना त्यांची EXCLUSIVE  मुलाखत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी घेतली. त्यांनी शरद पवार यांच्या प्रचाराच्या व्यस्त वेळेत कारमध्ये मुलाखत घेतली. त्यावेळी पवारांनी हे भाष्य केले. माझे राज्य आहे, त्यामुळे पाया अधिक मजबूत करण्यासाठी मी अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडाची प्रचारात चांगले काम करत आहेत. काँग्रेसचे नेते ताकदीने लढत आहेत. मात्र, - सत्तेचा गैरवापर कसा करावा, विरोधकांविरुद्ध सूडाचे राजकारण कसे करावे हे आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवले आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी भाजप आणि शिवसेना सरकारवर केली.


सूडाचे राजकारण सुरु आहे!


महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येत आहे. ईडीकडून चौकशी सुरु आहे. मात्र, मला पूर्ण खात्री आहे किती चौकशी करा काही हाताला लागणार नाही. दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या पत्नीशी कोणतेही व्यवहार झालेले नाहीत तर त्याचे स्पष्टीकरण का द्यायचे? सत्तेचा गैरवापर कसा करावा, विरोधकांविरुद्ध सूडाचे राजकारण कसे करावे हे आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवले आहे. 


पवारांचे रोखठोक भाष्य, 'ती पत्रं दाखवा'


मला पूर्ण खात्री आहे किती चौकशी करा काही हाताला लागणार नाही. ती जागा प्रफुल पटेल ८ ते १० वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी घेतली आहे. त्यांचे वडील मोठे उद्योजक होते, तो वारसा त्यांनी पुढे चालवला आहे. हे आरोप केले जातात त्यात काही तथ्य नाही. मी राज्य बँकेत कर्ज देण्यासाठी दिलेली शिफारस पत्र दाखवा, मलाही हे कळले पाहिजे. अशी शिफारस पत्र द्यायची नसतात याचे तारतम्य मला आहे. पण ते राज्याचे प्रमुख आहेत सहाजिकच ते आता ही पत्र दाखवतील, मी वाट बघतोय, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


भाजपने 'त्यांचा' वापर करुन बाजुला सारले 


मागील सहा महिन्यांत माझ्या पक्षात बऱ्याच गंमती घडल्या आहेत. सत्तेच्या काळात राष्ट्रवादीबरोबर काम केले, पुन्हा एकदा सत्तेशिवाय रहावे लागेल हे लक्षात आल्याने त्यांची चलबिचल झाली. त्यातील अनेक जणांनी सत्तेशिवाय किती काळ रहायचे, असे मला विचारले आणि त्यांनी पक्ष सोडला आहे. ज्यांनी पक्ष सोडला त्यातील पाच ते सहा लोक सोडले तर इतरांना संधी मिळालेली नाही. त्यांचा मर्यादीत उपयोग करून घेतला आणि नंतर बाजूला करून टाकले आहे. गेलेल्यांपैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे. भाजपला किती व्यक्ती उपयुक्त आहे, यावर त्याला काय द्यायचे हे धोरण असते. उपयोग नसतो त्यांचा वापर करून त्यांना बाजूला सारतील, असे पवार म्हणालेत.


वाजपेयींच्या काळातील भाजप वेगळा


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजप पक्ष वेगळा होता. वाजपेयींबरोबर काम करताना कोणाला अडचण यायची नाही. वाजपेयी विरोधकांना आक्रमक उत्तरे द्यायचे पण भाषा मृदू असायची. तिथे कटुता यायची नाही. अलिकडे सरकारविरोधी बोलणारा राष्ट्रद्रोह ठरवला जातो. देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री इथे येऊन सभा घेतात, आपले मुख्यमंत्री प्रत्त्येक मतदारसंघात जातायत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, इतर केंद्रीय मंत्री आले हे इथे पर्यटनासाठी फिरतायत का? यांना खात्री झालीच आहे. हे राज्य आपल्या हातातून जाईल की काय? लोकांचा मूड आपल्याविरोधात आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. आज राज्यात लोकांचा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी हे सगळे केले जात आहे.


'आताचा भाजप अमित शाह यांचा'


आज जो भाजप आहे तो वाजपेयी यांच्या काळातील भाजप नाही, हा भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप आहे. त्यामुळे वाजपेयींच्या काळातील सुसंस्कृतपणा असेल ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. सावरकरांची विज्ञानाचा आग्रह धरणारी मतं मला महत्त्वाची वाटतात, त्यामुळे त्यासाठी त्यांची भारतरत्नसाठी शिफारस केली असेल तर मला गैर वाटत नाही. भाजपने सावरकरांचे नेतृत्व कधीच मानले नव्हते, असे पवार म्हणालेत.


मी अनेक निवडणुका बघितल्या, मला लोकांचा मूड कळतो, यावेळी राज्यातली लोक चमत्कार करतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील का? याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, पण मला तशी स्थिती दिसत नाही, असे पवार शेवटी म्हणालेत.