Sharad Pawar On Manoj Jarange Candidacy : मराठा आंदोलनावरून रान पेटवणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आता चौकशीच्या चक्रव्युहात अडकलेत. जरांगेंच्या वक्तव्यावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. प्रकरणांचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी (Rahul Narvekar) केली. तर शरद पवार गट आगामी निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे, असा दावा भाजपा नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) केला होता. त्यावर आता पुण्यातील पत्रकार परिषदेत खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) उत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे फडणवीसांवर बोलताना गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी फडणवीसांविषयी बोलताना अपशब्द आणि जातिवाचक शब्द देखील उच्चारले. त्यामुळे आज सभागृहात त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी काही आमदारांनी उचलून धरली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी करण्यात यावी, असे आदेश दिले. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात रान पेटलंय. शरद पवार यांचे आणि मनोज जरांगे यांचे संबंध आहेत, यावर अनेक भाजप आमदारांनी दावे केलेत. तर आशिष देशमुखांनी वेगळाच सुर लावला होता.


शरद पवार गट बीडमधून लोकसभेसाठी जरांगेचा चेहरा पुढे करतील, असं अशिष देशमुख यांनी म्हटलं होतं. त्यावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे यांना आपण बीडमधून उमेदवारी देणार आहे का? असा सवाल पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर ''आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का? हा दावा कोणी केलाय?", असा प्रतिप्रश्न पवारांनी विचारला. त्यावर सर्वांनी एकसुरात आशिष देशमुख यांचं नाव घेतलं. त्यावेळी शरद पवार खदकन हसले अन् 'ज्यांचा मेंदू मर्यादित आहे, त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणार...', असं म्हणत टोला लगावला. शरद पवार यांनी यावेळी विरोधकांच्या आरोपांची उत्तरं देखील दिली.


आणखी वाचा - बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?


दरम्यान, मनोज जरांगेंचं उपोषण सुरु झाल्यानंतर त्यांना भेटायला मी गेलो होते. 2 समाजात अंतर वाढेल असे काही करु नका. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा राहील याची काळजी घ्या. तुमची भावना मी समजू शकतो. त्यानंतर आजपर्यंत मी एका शब्दाने त्यांच्याशी मी बोललो नाही किंवा भेटलो नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.