`ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी सहसा जात नाही, प्रत्येकाची...`; अयोध्येबद्दल पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On Ayodhya Invitation: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घटान सोहळ्याच्या आमंत्रणावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असतानाच शरद पवार यांनी जाहीररित्या हे विधान केलं आहे.
Sharad Pawar On Ayodhya Invitation: अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र या आमंत्रणावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे. अशातच आता या सोहळ्याच्या आमंत्रणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या केलेलं एक विधान चांगलेच चर्चेत आलं आहे.
राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाबद्दल काय म्हणाले पवार
बुधवारी सायंकाळी अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, शरद पवारांना अयोध्येतील सोहळ्याच्या आमंत्रणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्याला या सोहळ्याचं आमंत्रण आलेलं नाही असं म्हटलं. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. मात्र त्याचबरोबर आपल्या धार्मिक भूमिकेबद्दलही त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे. "भाजपा राम मंदिराचे राजकारण करत आहे की व्यवसाय करत आहे, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक," असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना, "अयोध्येत राम मंदिर उभारले गेल्याचा मला आनंद आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मला मिळालेलं नाही," असं शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, "पूजा-अर्चा ज्या ठिकाणी होते तिथे मी सहसा जात नाही. प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्याला माझा विरोध नाही," असंही शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरही बोलले
उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यावरुन वाद सुरु असताना याबद्दलही शरद पवारांनी भाष्य केलं. "उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाले की नाही हे मला ठाऊक नाही," असंही शरद पवार म्हणाले. मागील काही काळापासून महाराष्ट्रामध्ये स्वत: उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना या सोहळ्याला आमंत्रण देण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपल्याला उद्धव ठाकरेंना या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं आहे की नाही याची कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
बाळासाहेबांचा उल्लेख
तसेच यावेळी बोलताना शरद पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. "बाबरी पडली तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती," असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.