मुंबई : महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर, पवारांना मध्येच थांबवत 'ज्यावेळी आपण भाषणाला उभे राहता त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता... त्याऐवजी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. 


महाराजांचा महाराष्ट्र हा महाराजांचा आहे याबद्दल कुणाला शंका नाही... शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र एकसंध राहण्याची काळजी... या तीन व्यक्तींनी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधनासाठी कष्ट केले... गेल्या काही काळात जे काही प्रकार घडले त्यावरून आपल्या हेच लक्षात येतंय की अजूनही महाराष्ट्राला शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे... संघर्षामुळे महाराष्ट्र दुबळा होऊ द्यायचा नाही. 


त्यावर, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सावरकर, आंबेडकर या महापुरुषांकडेही मराठी माणूस जातीने पाहतो, हे बदलणं गरजेचं वाटत नाही का? जातीजातीमध्ये जो कडवटपणा आलाय तो दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. 


यावर, राज ठाकरेंशी आपण असहमत असल्याचं सांगत शिवाजी महाराजांकडे कुणीही जातीय दृष्टीनं पाहत नाही... महाराष्ट्राच्या बाहेर - दिल्लीमध्ये मराठा म्हणजे मराठी... तरुणांमध्ये मराठी अस्मिता आणि राष्ट्रीय अस्मिता बिंबवली गेली पाहिजे.


दुर्दैवानं आज महाराष्ट्रात जातीवाचक संघटना महाराष्ट्रात बाळसं धरतायत... सत्तेत बसलेल्या काही घटकांकडून त्यांना प्रोत्साहन मिळतंय... पण, हे चित्र फार दिवस टिकेल, असं वाटत नाही... महाराष्ट्र या रस्त्यानं जाणार नाही, तो शाहू, फुल्यांच्याच विचारानं जाईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही, असं पवारांनी म्हटलंय. 


राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवारांची उत्तरं... पाहा संपूर्ण व्हिडिओ