Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक महाविकास आघाडीकडे उड्या घेणार हे निश्चित होतं. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट मिळावं, यासाठी अनेकजण असतील असं देखील बोललं जातं होतं. आत्ता झालं देखील तसंच आहे. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना महायुतीमधील अनेक इच्छुक भेट घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष करून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि मेव्हणे पाहुणे असणारे माजी आमदार के पी पाटील, ए. वाय. पाटील यांनी शरद पवार याची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. हे दोघं तिथं असतानाच नुकताच भाजपला राम राम केलेले भाजपचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवार याची भेट घेत निवडणूक लढवण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी केलीय. दोन पाटील तिथं असतानाच राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतलीय. देसाई यांनी नुकतंच भाजपचा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. 


राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीला अजित पवारांच्या बाजूला असणारे के पी पाटील आणि ए वाय पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एका अर्थाने समरजीत घाटगे यांच्यानंतर भाजपचे राहुल देसाई हे देखील पवारांच्या गळाला लागले आहेत. 


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.  जागावाटपात राधानगरी मतदारसंघ  शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळेच के.पी.पाटील आणि ए.वाय.पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. मात्र शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे. 


दरम्यान, ज्या उद्देशाने पवारांनी आपला कोल्हापूर जिल्हा दौरा आखला होता, तो उद्देश साध्य होताना दिसत आहे. असं असलं तरी इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता शरद पवार हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून कोणाला संधी देतात आणि कोणाला थांबवतात हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.