राज्यामधील कांदा उत्पादकांना शेतमालाला भाव मिळत नसल्याचा मुद्दा विधानसभेपासून ते बाजारसमित्यांपर्यंत सर्वच ठिकाणी गाजतोय. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे सरकारची नुसतीच चर्चा सुरु असल्याची टीका केली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कांदा उत्पादकांसाठी काही ना काही पावलं उचलली आहेत, असं सांगतानाच पवारांनी राज्यातील नेते केवळ चर्चाच करत आहेत, असा टोला लगावला. यावेळेस पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उळ्लेख केला.


किमान 1200 भाव द्यावा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कांद्यांच्या खरेदी बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे," असं म्हणत नाशिकमधील पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पावर यांनी, "मार्केटमध्ये उतरुन नाफेडकडून खरेदी केली असं चित्र नाही. काही कंपन्यांच्या मार्फत खरेदी करण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा असल्याचं समजतं पण याचा मार्केटवर परिणाम झाल्याचं दिसत नाही," असं निरिक्षण नोंदवलं. यानंतर पत्रकारांनी, "नाफेडकडून खरेदी करताना लहान कांदा खरेदी केला जात नाही. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचं नुकसान होतं," असं म्हणत प्रश्न विचारला. या प्रश्नावर पवारांनी, "मी जे ऐकतोय लोकांकडून त्यानुसार ते कोणताच कांदा खरेदी करत नाहीत," असं पवार म्हणाले. त्यानंतर, "नाफेडकडून बाहेरच्या मार्केटमध्ये जी खरेदी केले जाते तिचा भाव 950 पर्यंत जाते. पण शेतकऱ्यांची मागणी आहे की नाफेडकडून खरेदी होत असेल तर 1200 ते 1300 रुपये द्यावेत," असं म्हणत पवारांना प्रतिक्विंटल दराबद्दल विचारण्यात आलं. त्यावर पवार यांनी, "निदान 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव तरी द्यावा ही मागणी माझ्याकडे पारनेरच्या शेतकऱ्यांनी केली," असं सांगितलं.


फडणवीसांचा उल्लेख करत टोला


"मध्य प्रदेशने भावांतर योजनेअंतर्गत कांद्याला एक हजार रुपयांचं अनुदान दिलं आहे," असं म्हणत पवारांनी एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता त्याचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच पवारांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली. "मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या 3 राज्यांमधील सरकारांनी काही ना काही पावलं उचलली आहेत. पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाहेब आणि यांची चर्चाच सुरु आहे. माहिती नाही बजेटमध्ये काही केलं तर. पण अद्याप तरी त्यांनी काही केलेलं नाही. या तीन राज्यांनी काहीतरी पावलं टाकली आहेत," असं पवार म्हणाले.


निर्यातीवरील बंदी काढावी


"करोनाआधी निर्यात 35 लाख मेट्रीक टनपर्यंत होती आता ती 15 लाख मेट्रीक टनपर्यंत आली आहे. निर्यातीवर कॅप लावण्यात आला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे," असं म्हणत पत्रकाराने पवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर शरद पवार यांनी, "निर्यातीवरील बंदी काढून ते सुरु करा. मग त्यावर काय निर्बंध लावायचे आहेत ते पाहता येईल. आधी निर्यात सुरु केली पाहिजे आणि त्यानंतर त्याचा काय परिणाम होतो ते पाहता येईल," असं उत्तर दिलं. हमीभावाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं सांगत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, "नाफेडनं कांदा खरेदी करावी कांदा बाजारपेठेमधून सरकारी यंत्रणेनं उचलून खरेदी केला पाहिजे. आज शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. कांदा हे एकमेव पीक आहे जे जिरायती शेतकऱ्याचं पीक आहे," असं पवार म्हणाले.


खतांसाठी जात विचारण्यावरुन म्हणाले...


"अवकाळी पाऊस सुरु आहे द्राक्षबागांचं नुकसान झालं आहे," असं म्हणत पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "डिटेल्स माझ्याकडे नाही पण कोकणातील काही कार्यकर्त्यांचा फोन आला की अंब्यावर परिणाम झाला. नाशिकमध्ये द्राक्षावर परिणाम झाला. गहू काढला नाही तिथंही परिणाम झाला. आम्ही माहिती कलेक्ट करुन राज्य सरकारशी बोलणार आहोत," असं सांगितलं. राज्यभरामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने पंचनाम्यांना अडचणी येतील अशी टीका होत असल्याच्या मुद्द्यावरुन विचारलं असता शरद पवार यांनी, "मला ठाऊक नाही," असं म्हणत प्रश्नाला बगल दिली. खतांसाठी जात विचारली जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना, "आजपर्यंत अशाप्रकारे खतासाठी जात विचारल्याचा प्रकार घडलेला नाही. विचारत असतील तर का विचारलं जात आहे? हे अत्यंत चुकीचं आहे," असं पवार म्हणाले.