दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाराज पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यामुळे शरद पवार बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईला परतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्थ पवार प्रकरणावरुन शरद पवार आज मुंबईहून बारामतीला जायला निघाले, पण अचानक ते पुण्यामध्ये थांबले. पुण्यावरून पुढे बारामतीला जाण्याऐवजी शरद पवार परत मुंबईला माघारी फिरले. शरद पवार पुण्यापर्यंत जाऊन त्यांनी आपला बारामती दौरा रद्द का केला? असा प्रश्न उपस्थित झाला होता.


पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं जाहीर विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या या विधानामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले गेले. शरद पवारांनी पार्थ पवारांना खडसावल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला. शरद पवारांच्या या विधानानंतर लगेचच अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांना भेटायला गेले. 


दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. तर संध्याकाळी तब्बल सव्वादोन तास पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओकवर सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केली. पार्थ पवार यांनी पुण्यात त्यांचे काका अभिजीत पवार यांचीही भेट घेतली. तर काल पार्थ पवार बारामतीमध्ये काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांच्या घरी गेले. 


श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पवार यांच्यासोबतच अजित पवार आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. दोनच दिवसांमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भातला वाद निवळेल, असा विश्वास पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला होता. तसंच पार्थ पवार दुखावले गेल्याचंही पहिल्यांदाच पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांनी मान्य केलं होतं. 


पार्थ पवार चूक का बरोबर हे ठरवता येणार नाही. तसंच शरद पवारांच्या मताविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. साहेबांचं कुटूंबातील ज्येष्ठत्व आणि वय याचाही विचार करायला हवा. या सगळ्यात पार्थ दुखावला जाणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबातल्या निकटवर्तीयांनी दिली.