खडसेंच्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाही - शरद पवार
पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
मुंबई : अतिवृष्टीमुळं सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे राज्यातील बळीराजाला. ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढं उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. सोमवारी या पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मंडले, यामध्ये त्यांनी एकनाथ खडसेंबद्दल देखील वक्तव्य केलं.
शरद पवार म्हणाले, 'खडसे यांनी भाजपसाठी खूप काही केलंय ते मोठे नेते होते, त्यांनी पक्षाला मोठं केलंय, मात्र त्यांच्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाहीये, त्यामुळे जिथे आपल्या कामाची नोंद घेतली जाते जावं असा विचार करतो. असं ते म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, रविवारी सुरू झालेल्या या या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. राज्यातील मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळं झालेलं संकट पाहता कर्ज काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हा मुद्दा अधोरेखित करत प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं म्हणत पवारांनी आश्वस्त करणारं वक्तव्य केलं.