Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतायत. आता या प्रकरणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं आहे. धमकी देणारा हा भाजप कार्यकर्ता असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
Sharad Pawar Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आलीय. तुमचा दाभोलकर होणार, असा धमकीचा मेसेज ट्विटरवरून (Tweeter) आलाय. या धमकीनंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिलीय. धमकी देणाऱ्याचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय. तसंच गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि जर पवारांना काही झालं तर देशाचे आणि राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असेल असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय.
अमरावती कनेक्शन
दरम्यान, शरद पवारांच्या धमकी प्रकरणाचं अमरावती (Amravati) कनेक्शन समोर आलंय. धमकी देणारा सौरभ पिंपळकर (Sourabh Pimpalkar) अमरावतीचा आहे. पिंपळकरविरोधात सध्या तरी कुठली तक्रार आलेली नाही. मात्र आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं आयुक्तांनी म्हटलंय. सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता (BJP) असल्याचा उल्लेख ट्विटरवर असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण आहे? याची चौकशी करा, आणि त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी अजित पवारांनी केलीय...
कोण आहे सौरभ पिंपळकर
सौरभ पिंपळकर हा अमरावतीच्या गोपालनगर भागातील रहिवासी आहे. तो भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमरावतीच्या VMC महाविद्यालयात विधी व्यवसायाच्या पेपर फुटीचं प्रकरण घडलं होतं. यात सौरभ पिंपळकर हा आरोपी होता. आता शरद पवार धमकी प्रकरणात सौरभ पिंपळकरचं नाव आल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपळकरविरोधात अद्याप तक्रार नसली तरी तो अमरावती पोलिसांच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान पवारांना धमकी दिलेल्या सौरभ पिंपळकरविरोधात नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसनं लेखी तक्रार दिलीय. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी नागपूर पोलिसांत तक्रार दिली. तसंच सौरभ पिंपळकरला अटक करण्याची मागणी केली. पवारांना धमकी केवळ कार्यकर्त्यांसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
फडणवीस यांनी दिला इशार
पवारांना धमकी आल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिलेयत...तसंच राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत...त्यामुळे कोणत्याही नेत्याला धमक्या देणं खपवून घेणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय...
पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शरद पवार पुण्यात राहत असलेल्या तसंच त्यांचं कार्यालय असलेल्या मोदीबाग इमारतीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तसंच मुंबईतल्या सिल्व्हर ओक घराबाहेरही बंदोबस्तातही वाढ करण्यात आलीय.