मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन झालं नाही. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. पण अद्यापही याचा तिढा सुटलेला नाही. यंदाची निवडणूक ही अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले. निवडणूकीच्या अगोदर फोडाफोडीचं राजकारण झालं, त्यानंतर महाजनादेश सारख्या यात्रा महाराष्ट्रात पार पडल्या, भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या उमेदवाराकरता प्रचार करतात आणि शरद पवार पावसात भिजून सभा घेतात यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आणि खास ठरली. या निवडणूकीचा परिणाम अगदी 'गुगल सर्च'वर देखील पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील निवडणूक आणि महाराष्ट्राचे नेते 'गुगल सर्च' आणि 'गुगल ट्रेंड' मध्ये पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 'गुगल सर्च'मध्ये देशभर ट्रेंडिग आहेत. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक लागतो. तर यानंतर उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी 'गुगल'वर सर्वाधिक माहिती शोधली आहे. 


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला पार पडली तर निवडणूकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला. त्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल 'गुगल'वर सर्वाधिक सर्च करण्यात आले. निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी झंजावाती प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात जान आणली. सातारा येथे त्यांनी पावसात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पवार यांच्या सभांना तरुण वर्गाने मोठा प्रतिसाद दिला.


'गुगल सर्च', 'गुगल न्यूज' आणि 'यूट्यूब' यांच्या एकत्रित सर्चवरून 'गुगल ट्रेंड'ची आकडेवारी उपलब्ध होत असते. 'गुगल ट्रेंड'वर ९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांबद्दल तुलनात्मक ट्रेंड पाहिले असता ही माहिती उपलब्ध झाली आहे.


महाराष्ट्रातील 'गुगल ट्रेंड'


(नेत्यांबद्दल झालेले सर्च)


शरद पवार : ६१ टक्के


देवेंद्र फडणवीस : २३ टक्के


उद्धव ठाकरे : ११ टक्के


संजय राऊत : ५ टक्के


(कालावधी : ९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२९)