कोल्हापूर : Sharad Pawar on UPA president : भाजपला शह देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीचे अर्थात युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांनी स्वीकारावे, असा आग्रह पुढे येत आहे. युवक काँग्रेसने याचा ठराव करत पवार हेच अध्यक्ष असतील असे सांगण्यात आले. मात्र, युपीएचे अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या राजकारणात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष होण्यासंबंधी चर्चा होती. या चर्चेला पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. मात्र, आज कोल्हापुरात मीडियाशी बोलताना पवार म्हणाले,  विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडीची जबाबदारी घेण्याची माझी इच्छा नाही, ती जबाबदारी मी घेणार नाही. पण विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी करणार आहे. ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे त्या पक्षांने पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले.


 शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, अशी चर्चा होती. तसेच महाराष्ट्र दौऱ्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन हे आले होते. त्यांनीही तिसऱ्या आघाडीबाबत चाचपणी केली. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे, याची चर्चा रंगू लागली होती.



दरम्यान, मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे, असं शरद पवारांनी यावेळी सांगितले.