वाल्मिकी जोशी, जळगाव, झी मीडिया : कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी रवींद्र नागपुरे ही उच्चशिक्षित तरुणी. रामेश्वरीचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले. ६ मार्चला त्या दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. तर, १८ मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साखरपुड्याच्या दिवशी दोन्ही बाजूच्या मंडळींच्या बैठकीत लग्नाच्या दिवशी हुंडा म्हणून तीन तोळे सोने आणि ५० हजार रुपये रोख देण्याचं ठरलं. पण, साखरपुडा झाला आणि काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईने दागिने आणि पैशांचा तगादा सुरू केला. 


त्यानंतर भूषण सातत्याने रामेश्वरीला हिणवू लागला. ''तू मला आवडत नाही. जाड आहेस. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला, पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही तर भुसावळात लॉनवर करायचे'' असे सांगून तो सारखा दम देत होता. 


भूषणच्या या सारख्या हिणवण्याला कंटाळून रामेश्वरी हिने अखेर एक पाऊल उचललं. आपल्या राहत्या घरी तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वरी हिच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.


रामेश्वरीच्या कुटुंबीयांनी नवरा मुलगा आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला.


दरम्यान, भुसावळ तालुका पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रामेश्वरी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.