Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. मविआकडून शेकापचे जयंत पाटीलही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. मात्र उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केलेला नाहीय. उद्धव ठाकरेंच्या मनात रायगड लोकसभेतील पराभवामुळे जयंत पाटलांबाबत असलेली नाराजी हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.


नाराजीची चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड लोकसभा निवडणुकीत शेकापकडून ठाकरेंचे उमेदवार अनंत गितेंना अपेक्षित मदत झाली नाही.. पेण आणि अलिबाग या दोन विधानसभा मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे.. त्या तुलनेत गीतेंना मतं मिळाली नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.. त्यामुळे जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये अशी ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिका आहे... दरम्यान, अशा नाराजीची चर्चा जयंत पाटलांनी फेटाळलीय.


काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. असं असलं तरी विधानसभेतील संख्याबळ काय सांगतंय त्यावर एक नजर टाकुया..


कुणाचे किती आमदार निवडून येतील?


- भाजपचे 103 आमदार आहेत त्यांचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात
- शिवसेना शिंदे गटाचे 38 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात
- काँग्रेसचे 36 आमदार आहेत त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 आमदार आहेत तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत. दोघांचा मिळून 1 उमेदवार निवडून येऊ शकतो


एकंदरीतच काय तर रायगड लोकसभेच्या पराभवाचा राग उद्धव ठाकरे विधानपरिषदेमध्ये आळवण्याच्या तयारीत आहेत.. जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळतं का? आणि ठाकरे गटाचे आमदार खुल्या दिलाने मदत करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.