शिल्पा अग्रवालला मिसेस युनिव्हर्स लव्हली किताब
आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही बाजी मारलीय.
अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये झालेल्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत, नागपूरच्या शिल्पा अग्रवालला मिसेस युनिव्हर्स लव्हली हा किताब मिळाला आहे. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही बाजी मारलीय.
पण शिल्पाचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिल्पाचं अठराव्या वर्षी लग्न झालं, त्यानंतर काही कौटुंबिक कलहामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आलं. लग्नाला चार वर्षं झाल्यावर वयाच्या बावीसाव्या वर्षी शिल्पानं आत्महत्या करण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतल्या. पण सुदैवानं शिल्पा त्यातून वाचली. त्यानंतर शिल्पाला पतीची भक्कम साथ मिळाली.
पती आकाश अग्रवालबरोबर शिल्पानंही फर्निचर निर्मितीच्या व्यवसायात पाऊल ठेवलं.. या व्यवसायात ती यशस्वी ठरली. व्यवसाय सांभाळतानाच तिनं सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घ्यायला सुरुवात केली. मिसेस नागपूर स्पर्धेपासून सुरुवात करत तिनं आता थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारलीय.
उद्योगाच्या क्षेत्रातही शिल्पा यांना अनेक पुरस्कार मिळवलेत. त्याचबरोबर सौंदर्य स्पर्धांच्या या क्षेत्रातही आणखी प्रगती करण्याची तिची इच्छा आहे.