अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसने भाऊसाहेब कांबळे यांना तर शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे भाजपकडून लोकसभा लढविण्याचा भाऊसाहेब वाकचौरे यांचा इरादा होता. मात्र, सेनेला मतदारसंघ गेल्याने वाकचौरे यांची अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. २००९च्या निवडणुकीत वाकचौरे यांनी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतर आपल्या संपर्काच्या माध्यमातून कायम जनसंपर्क वाकचौरे यांनी २०१४च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 


त्यानंतर वाकचौरेंनी भाजपत प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. तिथेही काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला. यानंतर वाकचौरेंनी भाजपमध्ये राहात साई संस्थानचे विश्वस्तपद मिळवले होते. यंदा निवडणूक लढवण्याची इच्छा असतानाही शिर्डी मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे वाकचौरेंनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, ती न मिळाल्याने आता वाकचौरे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.