शिर्डी हादरली : तिहेरी हत्याकांड, एकाला अटक
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आज एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील प्रसिद्ध शिर्डी येथे आज एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली. या घटनेने शिर्डी हादरली आहे. दरम्यान, या हल्ल्यातील आणखी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही भयंकर घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
निमगाव येथे विजय नगरात राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसेच शाळेत जाण्याची तयारी असलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचीदेखील हत्या केली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (३५) आणि तावू ठाकूर (१८) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव येथील तिघांची हत्या करण्यात आलेल्यांत नामदेव ठाकूर (६२), दगूबाई ठाकूर (५०), खुशी ठाकूर (१६) या तिघांचा समावेश आहे.
ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून हे हत्याकांड केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक पुढे आले आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे थरकाप उडाला आहे. हत्येनंतर खूनी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.