शिर्डी : कोरोना व्हायरसच्या coronavirus पार्श्वभूमीवर बऱ्याच महिन्यांच्या Lockdown लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरं खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत मंदिरं खुली झाली आणि भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठीसुद्धा देश- विदेशातून भाविक येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातील काही भाविकांना मात्र अडवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आल्याचं वृत्त हाती येत आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली तरीही त्यासंबंधीचे फलक मात्र येथे लावण्यात आले आहेत. तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे. 


दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी काहीजण हे तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचं मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आलंय किंबहुना यापैकी काही भाविकांना अडवत त्यांना भारतीय पेहरावासाठीची विनंतीही करण्यात आली. या निर्णयाचं काही भाविकांनी स्वागत केलं. पण, त्याबाबत संमिश्र प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. 


मुख्य म्हणजे अद्यापही या निर्णयाची सक्ती नसली तरीही मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक पाहता येत्या काळात या निर्णयाच्या मुद्यावरुन काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आणि मतमतांतरं समोर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


 


दरम्यान, भारतातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय पोषाखातच दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. दक्षिण भारतातील गुरूवायूर मंदिर किंवा अमृतसरमधील सुवर्णय मंदिर या ठिकाणी प्रवेशासाठी ठराविक पेहरावाचीच विनंती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आणि भाविकांनी त्याचं स्वागतही केलं. आता शिर्डीच्या बाबतीच हेच चित्र पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.