हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : सध्या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मरगळलेल्या अवस्थेत असताना पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या वाबळेवाडी गावची जिल्हा परिषद शाळा भारतासह जगभरात आदर्श ठरत आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची ही देखणी वास्तू साकारण्यासाठी 'आर्ट ऑफ लिव्हींग' आणि 'बँक ऑफ न्यूयॉर्क'ची मोलाची मदत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा म्हणून शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदची शाळा आदर्श मॉडेल ठरत आहे. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे आंतरराष्ट्रीय पातळीवर या शाळेचे नाव सध्या गाजत असून शिक्षणाचे एक वेगळे आणि आदर्श मॉडेल म्हणून या शाळेकडे पाहिले जात असून यासाठी गावातील ग्रामस्थांचा हि खुप मोठा वाटा असून वाबळेवाडी पॅटर्न हा सध्या देशभरात गाजत आहे.


वाबळेवाडीच्या शाळेचे देखणं रूप पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर भारताबाहेरूनही अनेक नागरिक या ठिकाणी भेट देत असून अनेक सेवानिवृत्त झालेले प्राचार्य शास्त्रज्ञ डॉक्टर या ठिकाणी येऊन स्वखर्चाने कुठलेही मानधन न घेता या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही इच्छुक आहेत. 



विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली ही शाळा असून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक वेगळच मैत्रीच नातं असून ईथे हिच मैत्री जोपासत वेगळ्या पध्दतीने शिक्षणाचे धडे येथील विद्यार्थी गिरवत आहेत.


आज हीच शाळा जगातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्थान बनली असून या शाळेच्या काचेच्या खोल्या पाहून तुम्हाला कदाचित परदेशातल्या एखादे हॉटेल आहे असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळच्या वाबळेवाडी येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.


ही देखणी वास्तू साकारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कची मोलाची मदत झाली आहे. ही शाळा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली झिरो एनर्जी शाळा ठरली आहे.


या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढील चार वर्षांचे प्रवेश पूर्ण झाले असून चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. तर दुसरीकडे या शाळेचा दर्जा आणि शिक्षण पद्धती पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून शिक्षक, अधिकारी, पालक शाळेला भेटी देत आहेत. अनेक राज्य सरकारे झिरो एनर्जी स्कूलचे मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याच्या तयारीत आहे.