मुंबई : Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे. शिवसेना भवन येथे  उद्धव ठाकरे हे बैठका घेत आहेत. त्यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. आता तर नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकीकडे सत्तापालट होऊन भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी झालेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून निर्णयांचा आढावा आणि नवे निर्णय घेतले जात असताना उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्ष बांधणीवर जोरदार भर देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. 


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुढचं पाऊल काय असणार? याविषयी मोठी चर्चा सुरु होती.  या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच आपण पुढे काय करणार याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ते शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीचा ते आढावा घेत पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत. 


शिवसेना बंडखोरांविरोधात आता ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या जागेवर पर्यायी आणि सशक्त उमेदवारांना शोध करा, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पक्ष बांधणीवर उद्धव ठाकरे यांनी जोर दिला असताना बैठकांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज दुपारी राज्यातील महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची बैठक  बोलावली  आहे. शिवसेना भवन इथं आज ही बैठक होणार आहे.