सातारा: माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे अगोदरच बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांची छुपी युती झाली आहे. माढा मतदारसंघात शनिवारी या तीन पक्षांतील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी नुकतेच भाजपवासी झालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि साताऱ्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी शिवसेना आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली. माढ्यातील या स्थानिक समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी अडचणीत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यातून निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तानंतर हा मतदारसंघ चांगलाच प्रकाशझोतात आला होता. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांची असलेली नाराजी लक्षात घेऊन शरद पवार यांनी वेळीच माढ्यातून माघार घेतली होती. परंतु, या सगळ्या घडामोडींमुळे आता माढ्यातील राजकीय लढत आणखीनच प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे हे माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मोहिते पाटील घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे आता ते या आव्हानचा कशाप्रकारे सामना करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मान भाजप कसा राखणार?


दरम्यान, कालच्या बैठकीनंतर रणजितसिंह निंबाळकर यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. ते लवकरच भाजपमध्ये दाखल होतील, असा अंदाज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याचीही दाट शक्यता आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्नभावाची वागणूक सतत मिळत होती. तसेच आघाडी धर्म न पाळता विकासकामात माझ्यासह कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होत राहिल्या. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा दिल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले होते.


राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाणार