अमित जोशी, मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील वजनदार घराण्याचे वारसदार रणजितसिंह मोहिते पाटील अखेर भाजपावासी झाले आहेत. त्यांना माढ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता नसली तरी योग्य तो मान राखला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तर मोहिते-पाटलांनीही भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. या आठवड्यात भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मोठे धक्के दिले. नगरच्या सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसमधून फोडलं. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या वजनदार घराण्यांपैकी एक असलेले सोलापूरच्या मोहिते-पाटलांनीही हाती कमळ घेतलं आहे.
माढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घालता येईल तितका घोळ घातला. आधी स्वतः माढ्यातून लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. त्यामुळे मोहिते पाटलांसह पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले. मात्र ऐनवेळी पवारांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा तिढा वाढवला. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी असा पवारांचा आग्रह होता. मात्र विजयसिंह आपल्या मुलाच्या नावासाठी आग्रही होते. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला माढ्यातील राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध सुरू केला. हा विरोध शांत करण्यासाठी पवारांनी किंवा राष्ट्रवादीनेही कोणतेच प्रयत्न केले नाहीत. परिणामी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २० वर्ष पवारांची साथ देणारे विजयसिंह मोहिते-पाटील प्रचंड नाराज झाले आणि ते पक्षापासून दुरावले. त्यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी देऊ केल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला आहे.
माढ्यातून रणजितसिहांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नसली तरी मोहितेंचा भाजपात मान राखला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या पदरात काय पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अखेर काय तर ज्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी रणजितसिंहांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली ती त्यांना भाजपकडूनही मिळाली नाही. आता भाजपा त्यांचा कसा मान राखणार याबाबत उत्सुकता आहे.