`खरी शिवसेना` शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात...
Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला.
Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीवरुन निर्माण झालेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहणार आहे. मात्र या निकालामुळे शिंदे गटाहून अधिक मोठा दिलासा अजित पवाराला मिळाला आहे. अवघ्या महिन्याभरात राष्ट्रवादीमधील फुटीवर अध्यक्षांकडून निकाल येणं अपेक्षित आहे. अशातच शिवसेनेचा निकाल आल्याने अजित पवार गट त्यांच्या निकालाबद्दल निश्चिंत झाल्याचं सांगितलं जात आहे.
ही अजित पवार गटासाठी जमेची बाजू
शिवसेना फुटीवरील निकालानंतर राष्ट्रवादीमधील फुटीवर महिन्याभरात निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेनेचा प्रश्न अध्यक्षांकडून निकाली निघाल्यानंतर आता लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटाकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या अर्जांवर अध्यक्षांकडे सुनावणी सुरु होईल. शिवसेनेतील फुटीवरील निकालात अध्यक्ष नार्वेकर यांनी पक्षाची सूत्रे कोणाकडे यावर निरीक्षण नोंदवलं. विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. विधिमंडळातील पक्षाला पक्ष संघटनेपेक्षा अधिक महत्त्व नार्वेकरांनी निकालात दिलं. ही बाजू अजित पवार गटासाठीही जमेची ठरणार आहे.
आम्ही निश्चिंत
शिवसेनेतील फुटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने राष्ट्रवादीतील फुटीत अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने निकाल लागेल अशी अपेक्षा अजित पवार गटातील नेत्यांना आहे. अजित पवार गटाचे नेते निकाल आपल्याच बाजूने लागेल याबद्दल फार आशावादी आहेत. शिवसेनेतील फुटीवरील निकालाने आम्ही निश्चिंत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्याने दिली आहे.
नक्की वाचा >> '...म्हणून आता आम्हाला उत्तम संधी'; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेत प्रतोदपदावरुन वाद
राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळात अजित पवार गटाचे बहुमत आहे. पक्षाचे 53 पैकी 40 पेक्षा अधिक आमदार अजित पवार गटात आहेत. त्यामुळे विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे संख्याबळ अधिक आहे. शिवसेनेच्या वादामध्ये पक्ष प्रतोद कोण यावरुनही वाद झाला. सुनील प्रभू अथवा भरत गोगावले यांच्यापैकी कोणाचा पक्षादेश कायदेशीर यावर बरेच दावे करण्यात आले. अखेर नार्वेकर यांनी गोगावलेचा व्हीपच योग्य असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीमध्ये हा असा वाद नाही. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ प्रतोदपदी अनिल पाटील आहेत.
नक्की वाचा >> 'भाजपाच्या टेस्ट ट्यूबमधून जन्मलेल्या शिंदे..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिवसेना म्हणजे...'
अचानक सत्तेत सहभागी झालेले
अजित पवार गट 2023 च्या मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. अचानक झालेल्या या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवारांबरोबरच त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासहीत अन्य महत्त्वाच्या आमदारांचा समावेश होता.