विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची थोड्याचवेळात औरंगाबादमध्ये सभा सुरु होणार आहे. मनसेने या सभेची जोरदार तयारी केली असून राज ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधीच शिवसेनेने (ShivSena) मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे हे डोंबाऱ्याच्या खेळातील माकड असून या माकडाला नाचवणारे डोंबारी कोण आहे हे जनतेला कळून चुकलं आहे असं सांगत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज औरंगाबादमधील तापडिया नाट्य मंदिरात शिवसैनिक प्रशिक्षण शिबीर होत आहे या शिबिरात त्या बोलत होत्या.


काही लोकांना आता काहीच विषय राहिलेला नाही. त्यामुळे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते काहीही करतायत. हे अस्तिव शिवसेनेला दाखवण्याची गरज नाही. शिवसेनेचं अस्तित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालं आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. 


मुंबईत राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा हट्ट धरला आता या राणा दाम्पत्याने जेलमध्ये हनुमान चालीसा म्हणावी, यांना जेलमधून सोडवायला देखील आता हनुमानच येणार आहे असं सांगत हे सर्व थोतांड असून शिवसेनेला खिजवण्यासाठी हे सर्व काही सुरू असल्याचा आरोप कायंदे यांनी केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना सोंगाड्या म्हणून संबोधलं होतं. दानवे यांच्या वक्तव्याचं देखील कायंदे यांनी समर्थन केले. विरोधकांच्या सभेच नाव बूस्टर डोस ठेवलं जातं आहे आम्हाला बूस्टर डोसची गरज नसून आम्ही लहाणपणीच बाळकडू घेतल्याच सांगत कायंदे यांनी भाजपवरही टीका केली.


'मनसेची सभा स्पॉन्सर'
औरंगाबादेत शिवसेनेचं पानिपत कुणी करू शकत नाही. आमच्या आधीच्या मित्रानं मनसेची सभा स्पॉन्सर केल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सभेसाठी मनसेनं पैसे देऊन लोकं आणल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सभेला 5 लाख लोक आले तरी फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय. 


शिवसेनेचा भाजपवरही निशाणा
भाजपची बुस्टर सभा आणि पोलखोल अभियानाला शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी शिवसेनेकडून बॅनरबाजी केली जातेय. 'पोल-खोल करून स्वतःचे ठेवा झाकून इतरांचे बघू नका वाकून नाही तर शिवसेना काढेल ठेचून' अशा आशयाचे हे बॅनर आहेत. आमदार सुनील राऊत यांच्याकडून हे बॅनर्स लावले गेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात भाजप आणि सेनेमध्ये संघर्ष अधिक तीव्र होणार स्पष्ट होतंय.