पॉस्को कंपनीच्या भंगारावरून शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राडा, गाड्यांची तोडफोड
पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
अलिबाग : रायगडच्या विळेभागाड एमआयडीसीतील पॉस्को स्टील कंपनीच्या भंगारावरून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा राडा झालाय. पॉस्को कंपनीतून माल वाहून नेणारे ट्रक विळे-कोलाड मार्गावर सुतारवाडी इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवून फोडले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तेथे पोहोचले असता त्यांच्याही गाडया फोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या गाडया फोडून नुकसान केलं आहे. यात आमदार भरत गोगावले यांच्या गाडीचाही समावेश आहे. त्यावेळी या गाडीत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेनेचे युवा अधिकारी विकास गोगावले हे होते, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर परीसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली .
विळे भागाड एमआयडीसीत असलेल्या पॉस्को स्टील या विदेशी कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट कुणाला मिळणार यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत नेहमीच संघर्ष होत असे.
कंपनीने या भंगारासाठी ग्लोबल टेंडर काढल्याने दोन्ही बाजूंकडून संताप व्यक्त होत होता. त्याविरोधात कंपनीच्या प्रवेशव्दारावर आंदोलने सुरूच होती . काही दिवसांपूर्वीच पॉस्को कंपनीच्या गेटवरच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रुमख अनिल नवगणे यांनाही धक्काबुक्की झाली होती.
त्यानंतर आज शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत विळा येथे या विषयावर बैठक झाली आणि हा वाद संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालवाहू - ट्रक फोडल्याने हा वाद पुन्हा उफाळला आहे.
कोलाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . दरम्यान हे प्रकार सातत्याने होत आहेत. हा वाद वेळीच मिटवला नाही तर राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या सेना राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.