महायुतीत भाजप तर महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट `मोठा भाऊ` ; कुणाच्या वाट्याला किती जागा?
राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवरील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर पूर्ण झालंय.. कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या, पाहूयात.
Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीपाठोपाठ आता महायुतीचं जागावाटप देखील पूर्ण झाल आहे. महायुतीचा 28-15-4-1 असा फॉर्म्युला ठरलाय... तर मविआचं 22-16-10 असं जागावाटप फायनल झालंय. जागावाटपात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.
महायुतीत भाजप 'मोठा भाऊ'
महायुतीत भाजप 'मोठा भाऊ' असल्याचे दिसत आहे. भाजपचे गेल्यावेळी 23 खासदार निवडून आले होते. आता भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे 13 खासदार होते त्यांच्या वाट्याला आता 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 खासदार होता. त्यांच्या वाट्याला आता 4 जागा आल्या आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागेवर लढत आहे.
महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट 'मोठा भाऊ'
महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गट 'मोठा भाऊ' असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे 5 खासदार होते आता ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक 22 जागा आल्या आहेत. काँग्रेसचा 1 खासदार होता. आता काँग्रेसचे 16 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 खासदार होते. त्यांच्या वाट्याला 10 जागा मिळाल्या आहेत.
कुणाची कुणाशी टक्कर?
राज्यातील 48 लढतींवर नजर टाकली तर प्रमुख सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच रंगणार आहे. 13 जागांवर शिवसेना ठाकरे गटाची मशाल विरुद्ध शिवसेना शिंदेंचा धनुष्यबाण अशी टक्कर होणार आहे. बारामती आणि शिरुर अशा 2 जागांवर राष्ट्रवादी शरद पवारांची तुतारी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवारांचं घड्याळ असा संघर्ष होणार आहे. तर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पालघर, सांगली, जळगाव अशा 4 जागांवर भाजपचं कमळ विरुद्ध शिवसेनेची मशाल अशी रंगतदार लढत होणार आहे.
महायुतीत भाजपनं तर मविआत शिवसेना ठाकरे गटानं सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या. जागावाटपात त्यांनी मुसंडी मारली. आता प्रत्यक्ष निकालात त्यांचे किती खासदार निवडून येतात, ते पाहायचे.