`शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही`; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, `सरकारच्या...`
Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.
Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या पुतळ्याचे कंत्राटदार आणि मूर्तीकार सगळे ठाण्याचेच होते असं म्हणत राऊत यांनी थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तसेच वाऱ्याचं कारण देणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा
पत्रकारांशी संवाद साधताना, "शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही," असं म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. "सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. शिंदेंच्या मर्जीजल्या ठेकेदारांना काम देण्यात आल्याचंही राऊत म्हणाले. ठेकेदार, शिल्पकार सगळेच ठाण्याचे आहेत," असंही राऊत म्हणाले. "सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. समुद्रावर वारा असणारच, वाऱ्याची कारणं कसली देता?" असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. "मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देऊन घाईघाईत मोदींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं," असा आरोप राऊतांनी केला आहे.
नक्की वाचा >> '3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल
नेहरुंनी उभारलेल्या पुतळ्याची करुन दिली आठवण
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी खाऱ्या वाऱ्यांचा परिमाण झाल्याने पुतळा कोसळ्याचं म्हटलं होतं. तसेच वाऱ्यांचा वेग 45 किमी प्रती तासापेक्षा अधिक असल्याने पुतळा कोसळल्याचंही सांगण्यात आलं. हे दावे फारच सुमार असल्याची टीका राऊतांनी केली. "1933 मधील टिळकांचा पुतळा अजूनही शाबूत नेहरुंनी शिवरायांचा बनवलेला पुतळाही सुस्थितीत आहे," असं सांगितलं. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला
शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून...
राऊत यांनी कालच सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करताना, "शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेय घेण्याची घाई, निवडणुकांचे राजकारण आणि राष्ट्रीय कामात खाऊबाजी यामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात ही शिवरायांनीच झिडकारले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामा द्यावा," अशी मागणी राऊतांनी केली. "महाराजांना हे सरकार मान्य नाही. शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला. फक्त निवडणुकीसाठी शिवरायांचा वापर केला जातोय," असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.