पुणे : विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय. शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. विधानपरिषद आमदार अनिल भोसलें आणि त्यांची पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह ११ जणांवर  गेल्या महिन्यात पुण्याच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनतर आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास होता. बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. 


आमदार अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असताना या बॅंकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वतःसाठी वापरले आणि त्यामुळे बॅंकेचं ७१ कोटी ७८ लाख रुपयांचं नुकसान झालं अशी तक्रार करण्यात आलीये. 



बॅंकेत जमा झालेले ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करुन परस्पर वापरल्याच रिझर्व्ह बँकेच्या लेखापरीक्षणात समोर आलंय. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचं संचालक मंडळ यापूर्वीच बरखास्त करण्यात आलं असून बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  


बँकेवर सध्या आर्थिक निर्बंध आहेत. बॅंकेत हजारो ठेवीदारांचे जवळपास तीनशे कोटी रुपये अडकले आहेत. अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी तीन वर्षांपासून त्यांनी भाजपशी घरोबा केलाय.


गेल्यावर्षी मे मध्ये बॅंकेवर आर्थिक निर्बंध आले होते. एक हजारपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही म्हणून खातेदार त्रस्त आहेत. त्यातच संचालक मंडळ बरखास्त झाले. तीन-चार महिन्यापासून यासंदर्भात तक्रारी येत होत्या. 


अनिल भोसले यांची भाजपशी जवळीक होती. त्यांची पत्नी भाजपची नगरसेविका होती. त्यामुळे ही घटना पाठीशी घातली जात असल्याचा संशय होता. पण आता सत्तापालट झाल्याने अनिल भोसलेंवर कारवाई होत आहे.