तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सातारा हा जिल्हा आतापर्यंत राष्ट्रवादीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे. मोदी लाटेतही या ठिकाणी पाच आमदार निवडून आले होते. मात्र आता या बालेकिल्ल्याला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले लवकरच राष्ट्रवादीच्या घड्याळाऐवजी भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी सध्या घडत असणाऱ्या राजकीय घडामोडी आणि भाजपने शिवेंद्रराजे यांच्यासाठी तयार केलेले पोषक वातावरण यावरूनच ते स्पष्ट होतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांनीही भाजपाप्रवेशाबाबत शिवेंद्रराजेंकडे आग्रह धरल्याचं समजतं आहे. त्यातच नुकतंच राष्ट्रवादी पक्षाने अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र या मुलाखतीला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दांडी मारली. शिवेंद्रराजे यांनी केवळ दांडीच मारली नाही तर पक्षाचा कुठलाही फॉर्म त्यांनी घेतलाही नाही. याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिवाय शिवेंद्रराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. 


भाजपकडून सातारा विधानसभेसाठी दीपक पवार इच्छुक होते. शिवेंद्रराजे यांना भाजपा घेण्यासाठी आणि उमेदवार जाहीर करण्यात दीपक पवार यांची अडचण होती. मात्र भाजपने पवार यांना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन ही अडचणही दूर केल्याचं बोललं जातं आहे. 


भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रराजेंकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.