युतीचं अजूनही तळ्यात मळ्यात, दोन्ही पक्षाचा स्वबळाचा दावा
शिवसेना भाजप युती होण्याअगोदरच एकमेकांसमोर उभे ठाकले
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : युती होणार नाही होणार अजूनही तळ्यात मळ्यात सुरु असतांना औरंगाबादेत मात्र शिवसेना भाजप युती होण्याअगोदरच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. करायची तर युती लवकर करा नाहीतर आमची सगळी तयारी असल्याची भाषा सुरु आहे. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवेसना नेते चंद्रकांत खैरै यांनी युती करायती तर लवकर करा, नाहीतऱ आमची तयारी झालीये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. बरं इतकंच बोलून ते थांबत नाही. तर युती झाली तर भाजपनं गांभिर्यानं युतीचं काम करावं असा दमही त्यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणूकांत भाजपनं माझ्या विरोधात प्रचार केला, आता मात्र हे खपवून घेणार नाही, आमच्या मतदारसंघात भाजपनं कार्यालय थाटली आहे ती सुद्धा खपवून घेणार नाही असा दम खैरैंनी भरला आहे.
शिवसेनेची तयारी झाली असेल तर आम्हीही गेल्या तीन वर्षांपासून तयारी करतोय, असं भाजपनं सांगितलं आहे. युती झाली तर ठिक नाहीच झाली तर तयारी आहे, असं भाजपनंही सुनावलं आहे. आणि आम्ही युतीचं प्रामाणिकपणेच काम करतो, असा टोलाही भाजपनं खैरैंना लावला आहे.
औऱंगाबाद शिवसेना भाजपमध्येही तसंही फारसं जमत नाही. लोकसभा निवडणूकांतही याचा प्रत्यय आला, त्यात आता विधानसभेतही या दोन्ही पक्षात चांगलांच झुंजणार हेच यातून स्पष्ट होतं आहे.