मुंबई : शिवसेनेला केवल अडीच वर्षेच नव्हे तर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची संधी असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. तर यापूर्वीही विधिमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मुख्यमंत्री झालेली आहे, असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. तसंच शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत नेमकं काय ठरतं यावर पुढची राजकीय समीकरणं अवलंबून असल्याचं अजित पवारांनी नमूद केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तास्थापनेच्या दृष्टीनं काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरू असलेल्या हालचालींवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेपासन दूर राहायला हवं अन्यथा पक्षाला आणखी फटका बसणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केली आहे. तर लवकरच चर्चेला सुरूवात करून सत्तास्थापन होणार असल्याचा विश्वास भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केला आहे.


भाजपा-शिवसेनेत अखेर नऊ दिवसांनंतर चर्चेची कोंडी फुटणार आहे. आजच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे थेट मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्येच चर्चा होण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेनं ताठर भूमिका घेतल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चेची दार बंद झालेली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेण्याचं ठरवल्यानं आता कोंडी फुटण्याची शक्यता आहे. पण तरीही कुठलीही नवी डेव्हलपमेंट नाही, असं सांगत शांत राहण्याचा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.