शिवसेना आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात?
राजकीय घडामोडींना वेग
मुंबई : एकीकडे सतत भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं असून, राऊतांच्या उपस्थितीत शरद पवारांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले होते. सोनियांना हा थेट पाठिंब्या निर्णय घ्यायचा नसल्याने, त्यांनी या नेत्यांची भेट वेणुगोपाल यांच्याशी घडवून आणली अशीही चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची खेळी आहे.
दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असं माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्म, जातीवर आधारीत राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस विरोधी पक्षात बसेल असं ते म्हणालेत. काही वरिष्ठ नेते दिल्लीला का गेलेत ते माहिती नाही असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ किंवा ४ नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक घेणार असून विरोधी नेत्यांशी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ते सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनाही भेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रीय पातळीवर पवारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आगामी संसदेचं हिवाळी अधिवेशन, दिल्ली विधानसभा निवडणूक आणि काँग्रेस अध्यक्षपदाबाबत या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता आहे.
भाजप मंगळवारी जर शपथविधी करत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र एका आठवड्याच्या आत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल, तेव्हा आता दूध का दूध और पानी का पानी होवून जाऊ दे अशी प्रतिक्रीया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. जोपर्यंत अमित शहा यांच्याकडून प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं असून जर हरियाणामध्ये स्वत: अमित शहा दुसऱ्या पक्षाशी चर्चा करतात, तशी चर्चा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशीही करावी. जर चर्चा केली नाही तर पर्याय आमच्याकडं आहेत असा इशाराही त्यांनी दिला आहे.