उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी, आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना टोला; `किती दिवस ही बालबुद्धी...`
Malvan Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.
Malvan Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. तसंच आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची असाही संताप त्यांनी व्यक्त केला. दरम्यान राड्यानंतर पोलिसांनी विनंती केली असता आदित्य ठाकरे, जयंत पाटील किल्ल्यातून बाहेर पडले.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला असून, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निषेध केला जात आहे. मात्र त्याआधीच राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.
नारायण राणे आज पाहणीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीने आज मोर्चाची घोषणा केली असताना आदित्य ठाकरेही दाखल झाले होते. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं. मात्र काही वेळाने दोन्ही कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले. अखेर तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.
राड्यावर बोलताना ते म्हणाले की, "हे फार दुर्देवी आणि बालिशपणाचं आहे. एका कॅमेऱ्यामनला धक्काबुक्की झाली आणि त्यातून सुरुवात झाली. मी कार्यकर्त्यांना महाराजांच्या किल्ल्यात राजकारण करायचं नाही सांगत अडवलं आहे. या बालिशपणात मला जायचं नाही. त्यांची हीच शिकवण आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे".
"आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
"जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढला. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. म्हणजे याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. यांना मंत्री म्हणून फिरताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही असताना या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.
पुण्यात एका एपीआयवर कोयत्याने हल्ला करण्यात आला, बदलापूरमध्ये 10 दिवस एफआयआर घेतला नाही आणि आता महाराजांचा पुतळा पडला आहे. म्हणजे भ्रष्टाचारी, खोके सरकार वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार करत आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.